Home Cities जळगाव जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा केली असून, जळगाव जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना केले आहे.

निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. अर्जांची छाननी २ जून रोजी होईल, तर अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ४ जून निश्चित करण्यात आली आहे. मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून, मतमोजणी २२ जून रोजी होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे काम पाहणार आहेत. उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे स्वीकारले जाणार आहेत.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत सदस्य मतदार म्हणून पात्र असतील. जळगाव शहर महानगरपालिकेसह अमळनेर, चोपडा, फैजपूर, रावेर, यावल, सावदा, भुसावळ, वरणगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, चाळीसगाव, बोदवड व मुक्ताईनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करणार आहेत.

दरम्यान, निवडणूक काळात सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तांवर पोस्टर, बॅनर, घोषणा, झेंडे किंवा भित्तीपत्रके लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


Protected Content

Play sound