जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या जळगाव शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना निसर्गालाही पाण्याची मोठी गरज भासत आहे. अशा परिस्थितीत शहरातील रायसोनी नगर परिसरातील दुसाने परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील झाडांना जीवनदान देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सुरू केलेल्या या ‘भगीरथ’ प्रयत्नांची शहरभर चर्चा होत असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
रायसोनी नगर परिसरात राहणारे सुहास दुसाने, भाग्यश्री दुसाने आणि त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य सुधाकर दुसाने हे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील झाडे जगवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आठवड्यातून ज्या तीन दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी हा परिवार आपली मोपेड गाडी घेऊन परिसरात फिरतो. मोपेडवर पाण्याच्या बादल्या ठेवून प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचवले जाते. उन्हामुळे कोमेजण्याच्या स्थितीत आलेल्या झाडांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळत आहे.

विशेष म्हणजे या उपक्रमात ८० वर्षीय सुधाकर दुसाने यांचा सहभाग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वयाच्या या टप्प्यावरही ते उत्साहाने झाडांना पाणी घालत असून आपल्या मुलगा आणि सुनेसोबत पर्यावरण रक्षणाच्या कार्यात खांद्याला खांदा लावून उभे आहेत. त्यांच्या या कार्यामुळे तरुण पिढीसमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.
जळगाव शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान असते. मात्र सुहास दुसाने यांनी त्यावरही वेगळा मार्ग शोधला आहे. परिसरातील झाडे वाचवण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेकडून स्वतंत्र नळ कनेक्शन घेतले आहे. या कनेक्शनची पाणीपट्टी देखील ते नियमितपणे स्वतः भरत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःच्या खर्चातून आणि मेहनतीतून सुरू ठेवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दुसाने परिवाराचा सामाजिक सहभाग केवळ झाडांना पाणी घालण्यापुरता मर्यादित नाही. ‘एस डी फाउंडेशन’च्या माध्यमातून ते विविध पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असतात. परिसर स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि जनजागृतीसारख्या उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
“वाढत्या तापमानावर फक्त चिंता व्यक्त करून उपयोग नाही. झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा ती जगवणे अधिक आवश्यक आहे. आमच्या छोट्याशा प्रयत्नामुळे परिसर हिरवागार राहणार असेल, तर त्यातून आम्हाला आत्मिक समाधान मिळते,” अशी भावना दुसाने परिवाराने व्यक्त केली.



