वरणगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा जीवघेणा ठरला असून नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर प्रशासनाने संबंधित परिसरातून पाच कुत्री जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारकेश विशाल झोपे (वय ९) हा विद्यार्थी दि. २४ एप्रिल रोजी सकाळच्या वेळी शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या. जखमांची तीव्रता इतकी होती की त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके घालावे लागल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर जखमी तारकेशला तातडीने जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने आणि प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता भासल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. शहरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनावर टीका केली आहे. अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक भयभीत वातावरणात वावरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने कारवाई करत खन्ना कोळी यांच्या घरातून पाच कुत्री जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित कुत्र्यांबाबत पुढील तपास आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुसावळ शहरात यापूर्वीही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात तातडीने कुत्र्यांचे निर्बिजीकरण, नियंत्रण मोहीम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



