Home क्राईम नीट-यूजी 2026 परीक्षा रद्दप्रकरणी अभाविप आक्रमक

नीट-यूजी 2026 परीक्षा रद्दप्रकरणी अभाविप आक्रमक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नीट-यूजी 2026 परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संताप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. परीक्षेची गोपनीयता आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी अभाविपने केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अभाविपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध माध्यमांमधून तसेच नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि तपास यंत्रणांकडून समोर येत असलेल्या माहितींमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून नीटसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात. अशा परिस्थितीत प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही लोकांपर्यंत पोहोचत असल्याच्या घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचे अभाविपने नमूद केले आहे.

संघटनेने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की प्रवेश परीक्षांच्या शुचितेशी कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य केली जाऊ शकत नाही. पेपर लीकसारख्या घटनांमुळे केवळ परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत नाही, तर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अन्याय होतो. त्यामुळे या प्रकरणातील परीक्षा माफिया, संबंधित व्यक्ती आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने केंद्र सरकारकडे केली आहे.

अभाविपने NTA कडूनही अधिक पारदर्शकतेची अपेक्षा व्यक्त केली आहे. चौकशी सुरू असताना विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. परीक्षेसंदर्भातील अफवा, संभ्रम आणि चुकीची माहिती यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याने अधिकृत माहिती वेळोवेळी जाहीर करण्याची गरज असल्याचेही अभाविपने नमूद केले.

अभाविपचे देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि संघर्षानंतर नीटसारख्या परीक्षांना सामोरे जातात. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अनियमितता विद्यार्थ्यांच्या मनोबलावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम करणारी असते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये.”

त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही सांगितले. अभाविप विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठवत राहील तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound