जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पथकाने पारोळा शहरात एका मोठ्या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश केला आहे. राष्ट्रीय महामार्गवरील म्हसवे शिवार परिसरात सुरू असलेल्या ‘सोडियम बाय सल्फेट’ या घातक रसायनाच्या अवैध साठवणुकीवर पोलिसांनी धाड टाकली असून, या कारवाईत एकूण ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, म्हसवे शिवारातील रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेलच्या मागील बाजूला दिनेश पोपटराव पाटील (वय ४३) हा इसम लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रसायनांचा साठा करत आहे. हे रसायन काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवले जात होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तातडीने पारोळा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. ११ मे रोजी या पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी दिनेश पाटील हा मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह रंगेहाथ मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा १२ चाकी टँकर, अंदाजे ३८ हजार ७५० लिटर रसायनयुक्त पदार्थ, १५ हजार लिटर क्षमतेचा जमिनीवरील टँकर, मोटारसायकल, मोबाईल आणि रसायनांच्या टाक्या असा एकूण ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी दिनेश पाटील याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत.



