जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट आणि परिसरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवार, १२ मे रोजी अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठी कारवाई केली. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत हॉकर्सकडून लपवून ठेवण्यात आलेल्या पेट्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे फुले मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली.
फुले मार्केट आणि परिसरातील अतिक्रमण तसेच स्वच्छतेच्या प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर नगरसेवक रमेश मतानी यांनी महापौरांकडे निवेदन सादर करून फुले मार्केटमधील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सातत्याने कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून पथकाने फुले मार्केट परिसरात धडक मोहीम राबवत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेल्या पेट्या, टेबल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, फुले मार्केटमध्ये हॉकर्सचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र काही जण लपूनछपून व्यवसाय करत असून गल्लीबोळांमध्ये वस्तू ठेवून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ पेट्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कारवाईदरम्यान काही हॉकर्सकडून विरोध होत असल्याचेही संजय ठाकूर यांनी नमूद केले. तरीही शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



