Home क्राईम बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास ; परिसरात खळबळ

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास ; परिसरात खळबळ


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिलीप रणविजय गुप्ता (वय-५५, रा. समृद्धी हाईट्स, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप गुप्ता हे आपल्या कुटुंबासह एका लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. १० मे रोजी सकाळी ५:३० ते ११ मे रोजी सकाळी ५:३० च्या दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचे दार तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ४० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट, ३० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची चेन, १५ हजार रुपयांचे सोन्याचे झुमके, सोन्याच्या दोन अंगठ्या, लकी, मंगलसूत्र आणि चांदीची साखळी अशा एकूण १ लाख ७६ हजार ५०० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. ११ मे रोजी सकाळी जेव्हा गुप्ता कुटुंब घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे दार तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक युनुस शेख पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound