जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मद्याच्या अति सेवनामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या एका तरुणाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून नवजीवन दिल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वेळेत केलेले निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त होऊन सामान्य जीवन जगत आहे.
धरणगाव तालुक्यातील देवीदास नामक ४७ वर्षीय तरुणाला दीर्घकाळापासून मद्यपानाचे व्यसन जडले होते. सतत मद्यपान करणे, वागण्यात अचानक बदल होणे, अनियंत्रित बडबड करणे तसेच हातपाय थरथरणे अशा गंभीर लक्षणांमुळे त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. परिस्थिती चिंताजनक बनल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव आणि डॉ. राठोड यांनी संबंधित रुग्णाची सखोल वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये एमआरआयसह विविध आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर संबंधित तरुणाला ‘अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर’ असल्याचे निदान करण्यात आले.
निदान स्पष्ट झाल्यानंतर मानसोपचार विभागातील डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारली. उपचारामध्ये औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यावर विशेष भर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात रुग्णाला अस्वस्थता, चिडचिड, झोप न लागणे आणि मानसिक तणाव अशा समस्या जाणवत होत्या. मात्र डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.
काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला. हातपाय थरथरण्याचे प्रमाण कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि त्याला मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला आहे.
याबाबत माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. यामध्ये रुग्णाची इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे सहकार्य आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे घटक ठरतात.
डॉ. ऋचिता आटे यांनी सांगितले की, या यशस्वी उपचारामुळे समाजात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश गेला असून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. वेळेत उपचार घेतल्यास व्यसनाधीन व्यक्तीला नवजीवन मिळू शकते, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.



