Home क्राईम नाशिक धर्मांतर प्रकरण : मास्टरमाईंड निदा खानला आश्रय देणारा ‘तो’ नगरसेवक अखेर...

नाशिक धर्मांतर प्रकरण : मास्टरमाईंड निदा खानला आश्रय देणारा ‘तो’ नगरसेवक अखेर निष्पन्न 


नाशिक- वृत्तसेवा । नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या ४० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी सक्रिय मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना सहआरोपी केले असून त्यांच्या विरोधात बीएनएस कलम २४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’पर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे.

निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांच्या संपर्कात होती. पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वीच नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट खरेदी केला होता आणि याच घरात निदा खानचा मुक्काम होता. नाशिक गुन्हे शाखेला तांत्रिक तपासाद्वारे निदा खान संभाजीनगरमध्ये असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली गेली. मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात निदा खान पोलिसांच्या जाळ्यात अडकली. अटकेपासून वाचण्यासाठी तिने गरोदर असल्याचे बनावट प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र हे प्रकरण गंभीर असून परकीय निधी (Funding) आणि धर्मांतराच्या मोठ्या जाळ्याशी संबंधित असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला होता.

या प्रकरणातील अन्य आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांनाही पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावण्यासोबतच तिला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि या कृत्यासाठी कोठून अर्थपुरवठा झाला, याचा सखोल तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत. दरम्यान, मतीन पटेल हे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जातात. संभाजीनगर महापालिकेत ते प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वीही ते एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे चर्चेत आले होते, मात्र आता गंभीर गुन्ह्यातील आरोपीला आश्रय दिल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याला ‘कॉर्पोरेट जिहाद’ संबोधत, निदा खानला संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाने आश्रय देणे हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला. तसेच इम्तियाज जलील यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, आमदार नितेश राणे यांनी एमआयएमवर टीका करताना या पक्षातील व्यक्तींची पार्श्वभूमी तपासण्याची गरज व्यक्त केली. निदा खानच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास आता आंतरराष्ट्रीय फंडिंगच्या दिशेने सुरू झाला आहे.


Protected Content

Play sound