जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून होती. अखेर उद्या हा निकाल ऑनलाईन जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे :
- sscresult.mahahsscboard.in
- Target Publications Results
- DigiLocker Results
- Maharashtra State Board Official Website
- Navneet Results
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी आपला आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे निकाल आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक नियोजनाला वेग मिळत आहे.
यंदा बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता दहावीचाही निकाल 8 मे रोजी घोषित होत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नवीन शैक्षणिक वर्षाची तयारीही वेळेत पूर्ण होणार आहे.



