Home Cities मुक्ताईनगर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करा ; नगरसेवक नितीन जैन यांची मागणी

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करा ; नगरसेवक नितीन जैन यांची मागणी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात पावसाळा तोंडावर आला असतानाही नाले व गटारींच्या साफसफाईचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती आणि अस्वच्छतेमुळे पसरणारे आजार लक्षात घेता, नगरसेवक नितीन मदनलाल जैन यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील मोठे नाले गाळाने भरलेले असून, अनेक ठिकाणी वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १७, १३ आणि १२ मधील मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विशेषतः गोदावरी मंगल कार्यालयामागील मोठा नाला पूर्णपणे गाळाने तुडुंब भरलेला असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई न केल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जलमय परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रशासनाने वेळेत दखल घेणे आवश्यक असल्याचे नितीन जैन यांनी म्हटले आहे.

केवळ मोठे नालेच नव्हे तर शहरातील अंतर्गत गटारींमध्येही मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. सफाई कामगारांच्या नियोजनाचा अभाव आणि नियमित स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. अनेक प्रभागांमध्ये कचरा संकलन करणाऱ्या गाड्या नियमितपणे फिरत नसल्याने कचरा कुंडीबाहेर पडत असून, पावसाळ्यात यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांवर योग्य देखरेख नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

नगरसेवक नितीन जैन यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर संपूर्ण शहरातील नाले व गटारींची साफसफाई पूर्ण करावी. कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या सोयीसाठी तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता नगरपंचायत प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound