Home प्रशासन तहसील अवैध गौण खनिज प्रकरणात यावल तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई

अवैध गौण खनिज प्रकरणात यावल तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विक्री प्रकरणात प्रशासनाने मोठे पाऊल उचलत यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेकडून हा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमोदे (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी ३० जानेवारी २०२४ पासून ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत सातत्याने तक्रारी आणि निवेदने सादर केली होती. याशिवाय आमदार राजूमामा भोळे यांनीही या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

तक्रारींची दखल घेत प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे अहवाल, पंचनामे आणि इतर कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले. या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्यालय प्रमुख म्हणून तहसीलदारांनी पर्यवेक्षणीय जबाबदारीत कसूर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांच्यावरही शिस्तभंग कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.


Protected Content

Play sound