Home Cities यावल वड्री ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण

वड्री ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या वड्री गावात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक धनंजय पाचपोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन महाराष्ट्राच्या स्थापनेचा अभिमान जागवण्यात आला.

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षातून आणि मराठी भाषिकांच्या बलिदानातून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ आणि राज्यासाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर वड्री ग्रामपंचायतीने हा दिवस साजरा करताना गावातील जेष्ठ आणि अनुभवी व्यक्तीला सन्मान देण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रमात सरपंच अजय भालेराव यांच्या पुढाकाराने आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा बहुमान सेवानिवृत्त शिक्षक धनंजय सेनु पाचपोळे (गुरुजी) यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येताच उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशभक्तीचा सन्मान केला. या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, ग्रामसेवक आर. एन. तडवी, ग्रामपंचायत सदस्य व्ही. पी. चौधरी, सरदार तडवी, फकीरा तडवी, अकरम तडवी, सादिक तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत एकात्मतेचा संदेश दिला.


Protected Content

Play sound