जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरातील गॅस एजन्सीची गोडावून फोडून सिलेंडरची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतून १०० गॅस सिलेंडर आणि वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेले होते. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे आणि घटनास्थळावरील निरीक्षणावरून संशयास्पद वाहनांचा शोध घेतला. यानंतर पोलिसांनी शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद) या तीन आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये ६२ भरलेले गॅस सिलेंडर, ९५ रिकामे गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्कमन मोपेड यांचा समावेश आहे. सध्या आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे अधिक तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.



