Home आरोग्य उष्णतेची लाट ठरतेय धोकादायक ; तातडीच्या उपाययोजनांची गरज – डॉ. कमलेश तायडे

उष्णतेची लाट ठरतेय धोकादायक ; तातडीच्या उपाययोजनांची गरज – डॉ. कमलेश तायडे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावसह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून “ही साधी उन्हाळी गरमी नसून उष्णतेची लाट आहे” असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. वाढते तापमान, रात्रीही न जाणारा उकाडा आणि अंगावर जाळ बसल्यासारखी भावना यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उष्णतेची लाट ही केवळ अस्वस्थता निर्माण करणारी परिस्थिती नसून शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी करते. यामुळे रक्तदाब बिघडणे, मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर परिणाम होणे असे गंभीर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटना यांच्या मते, उष्णतेच्या लाटांमुळे गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

जळगाव येथील महादेव हॉस्पिटल मधील न्युरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी सांगितले की, उष्णतेचा परिणाम सुरुवातीला साध्या लक्षणांमधून दिसतो. खूप तहान लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, चिडचिड, हात-पायांना गोळे येणे, मळमळ आणि अंग गरम होणे ही सुरुवातीची चिन्हे आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास हीट एक्सॉश्शन आणि पुढे हीट स्ट्रोकसारखी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. हीट स्ट्रोकमध्ये रुग्ण गोंधळलेला दिसतो, घाम कमी होतो किंवा थांबतो आणि बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो.

ग्रामीण भागात उष्णतेचा धोका अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकाम, बांधकाम, पाण्यासाठीची पायपीट आणि उन्हात दीर्घकाळ राहणे यामुळे नागरिकांचा संपर्क उष्णतेशी जास्त होतो. अनेक घरांमध्ये पुरेशी थंड व्यवस्था किंवा पाणी उपलब्ध नसल्याने वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार आणि किडनीचे आजार असलेले रुग्ण अधिक धोक्यात येतात.

उष्णतेपासून बचावासाठी पाणी आणि विश्रांती हे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. तहान लागण्याची वाट न पाहता वारंवार पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस घेणे आवश्यक आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच काम करावे. सैल, फिकट रंगाचे कपडे घालावेत तसेच डोक्यावर टोपी किंवा ओढणी वापरून शरीराचे संरक्षण करावे.

घरामध्येही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दिवसा खिडक्या आणि पडदे लावून ऊन आत येऊ न देणे, रात्री आणि पहाटे हवा खेळती ठेवणे, तसेच लहान मुले आणि वृद्धांना थंड व हवेशीर ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोणालाही बंद गाडीत किंवा खोलीत एकटे सोडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

डॉ. कमलेश तायडे यांनी सांगितले की, जर रुग्ण गोंधळलेला दिसत असेल, उलट्या होत असतील, चालता येत नसेल किंवा शुद्ध हरपत असेल, तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. अशा वेळी रुग्णाला थंड ठिकाणी हलवून अंगावर थंड पाणी टाकावे किंवा ओले कापड ठेवावे आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करावे.

फक्त वैयक्तिक काळजी पुरेशी नसून गावपातळीवरही तयारी करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती केंद्रे, ओआरएस साठा आणि आशा-आंगणवाडी सेविकांमार्फत नियमित तपासणी यांसारख्या उपायांनी मोठ्या प्रमाणात धोका कमी करता येतो. हवामान बदलांवरील उपाययोजनांमध्ये पूर्वसूचना प्रणाली आणि आरोग्य कृती आराखडा महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Previous articleत्रासदायक माकड पकडल्यास मिळतील ६०० रुपये !
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound