जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि “आरोग्य संपन्न” बनवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे अभियान केवळ पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता जनआंदोलनात रूपांतरित करण्यावर भर दिला.
राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा देणे हा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे या मोहिमेचे प्रमुख ध्येय आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन गावांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक गावात आरोग्य सेवा घराजवळ पोहोचणे अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग मिळवून हे अभियान व्यापक जनआंदोलनात रूपांतरित करावे. माता व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण आणि स्वच्छता या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासोबतच शुद्ध पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनावर ठोस काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, गावोगावी जनजागृती करावी आणि नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच डोक्याचे संरक्षण करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही शेतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळीच करण्याचा सल्ला देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी अभियानाच्या यशासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रत्येक गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरपंच प्रतिनिधी म्हणून झुरखेडा येथील सुरेश पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करत गावपातळीवरील अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक स्वप्निल सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री अकलाडे, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन भायेकर यांनी करत अभियानाची सविस्तर माहिती दिली, तर सूत्रसंचालन भूषण क्षत्रिय यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. रमेश धापते यांनी मानले.



