मुंबई (वृत्तसंस्था) गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो, मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, “२०१४ साली जेव्हा ऑपरेशन झाले तेव्हाच गणेश नाईक यांना पक्ष सोडायचा होता. गणेश नाईक यांच्या मांडीच्या हाडाचे ऑपरेशन होते आणि तिकडे बैठक चालू होती. तेव्हा शरद पवारांनी घरी बोलावून सांगितले की, गणेश नाईक कधीच गद्दारी करणार नाहीत हे पत्रकार परिषद घेऊन सांग. त्यानंतरच्या घडामोडी सांगू शकत नाही. गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. राज्यात सत्ता असतानाही कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भायंदर मध्ये चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादी वाढली नाही. गणेश नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता इथे जी फाटाफूट होत आहे, त्यामागे गणेश नाईक यांचा हात असेल,असेही आव्हाड म्हणाले. एवढेच नव्हे तर, आज भाजपाच्या नेत्या मंदा म्हात्रे आम्ही गणेश नाईक यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही, असे उघडपणे सांगत आहेत. मग आता गणेश नाईक यांचा स्वाभिमान कुठे गेला? असा सवालही अव्हाड यांनी विचारला आहे.