फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सहकार क्षेत्र अधिक सक्षम आणि संघटित करण्याच्या उद्देशाने सहकार भारतीच्या संस्थागत सदस्य नोंदणी अभियानाचा जळगाव जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी व्यापक चर्चा झाली.
या बैठकीस राष्ट्रीय संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदूरणीकर तसेच सहकार भारती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संजय बिर्ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांनी सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारी संस्थांना एकत्र आणून ‘सहकार से समृद्धी’ हे ध्येय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी नुकत्याच लोणावळा येथे पार पडलेल्या सहकार भारतीच्या प्रदेश बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. त्या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना सहकार भारतीचे सदस्य करून व्यापक सहकार चळवळ मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात संस्थागत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार कायद्यानुसार नोंदणी झालेली प्रत्येक सहकारी संस्था या अभियानात सहभागी होऊ शकते. सहकारी बँका, पतसंस्था, विकास सोसायट्या, दूध डेअऱ्या तसेच इतर विविध सहकारी संस्थांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात समन्वय, संवाद आणि सक्षमीकरण वाढीस लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीत सहकार चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील संस्थांपर्यंत पोहोचण्याची रणनीती ठरविण्यात आली. सदस्य नोंदणी अभियान केवळ औपचारिक उपक्रम नसून सहकार चळवळीला नवे बळ देणारे आंदोलन ठरणार असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या बैठकीस उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील, चाळीसगावचे प्रवीण कुडे, धरणगाव महानगर अध्यक्षा शोभाताई पाटील, महामंत्री प्रमोद नगरकर, शांताराम बापू, अनिता वाणी, आशुतोष अडावडकर, प्रवीण गडे, प्रवीण नाना उंबरखेडेकर, जयदीप शहा यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे ग्रामीण व महानगर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन ग्रामीण महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.



