Home धर्म-समाज अक्षय तृतीयेनिमित्त यावलमध्ये बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा उत्साहात

अक्षय तृतीयेनिमित्त यावलमध्ये बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा उत्साहात


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अक्षय तृतीयेच्या पवित्र पर्वानिमित्त यावल शहरात पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री मनुदेवी मंदिरापासून मुख्य बुरूज चौकापर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, तर संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

सायंकाळी सहा वाजता यावल-फैजपूर मार्गावरील श्री मनुदेवी मंदिरातून या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या काळभैरव महाराजांच्या बारागाड्या ओढण्याच्या या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व असून स्थानिकांसाठी तो श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो. या कार्यक्रमात भगत किशोर बारी यांनी बारागाड्या ओढल्या, तर बगले म्हणून रोहित कोळी आणि तन्मय बारी यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान भावी भगतांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. युवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत पारंपरिक विधींचे पालन केले. बारागाड्या ओढताना जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण अधिकच रंगले होते.

या धार्मिक सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.


Protected Content

Play sound