जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वरून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच नामांकन व शिफारसी स्वीकारण्यात येणार असून, यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात. नामांकन करताना संबंधित व्यक्तीचे कार्य “Excellence Plus” या निकषांनुसार अत्युच्च दर्जाचे असणे आवश्यक असून, त्यामध्ये समाजसेवेचा घटक असणेही गरजेचे आहे.
यासोबतच, शिफारस करताना संबंधित व्यक्तीस यापूर्वी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत का, याची नोंद घेणे अपेक्षित आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला, दिव्यांग आणि समाजातील दुर्बल घटकांतील गुणी व्यक्तींनाही प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मरणोत्तर पुरस्कारासाठी शक्यतो शिफारस करू नये, मात्र अपवादात्मक प्रकरणांमध्ये जानेवारी २०२६ नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो. यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारल्या जाणार नाहीत.
पद्मभूषण पुरस्कारासाठी पद्मश्री मिळाल्यानंतर किमान ५ वर्षांनी शिफारस करता येते, तर पद्मविभूषणसाठी पद्मभूषण मिळाल्यानंतर ५ वर्षांची अट आहे. मात्र अपवादात्मक कामगिरीच्या प्रकरणांमध्ये ही अट शिथील केली जाऊ शकते.
शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी (डॉक्टर व वैज्ञानिक वगळता) पद्म पुरस्कारांसाठी पात्र नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयीन विभागांनी योग्य निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींच्या शिफारसी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात. अंतिम मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचे नामांकन स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



