पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील कृष्णपुरी भागात एका ३९ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेला असताना, संशयित आरोपी शेखर गोकुळ राजपूत (रा. पुनगाव, ता. पाचोरा) याने तिच्याशी ओळख वाढवली. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.

पोलीस रेकॉर्डनुसार, हा अत्याचार १० जानेवारी २०२० पासून ते २ एप्रिल २०२६ पर्यंत सातत्याने सुरू होता. पाचोरा शहरातील पीडितेच्या वडिलांच्या घरी तसेच शहरातील ‘रविराज हॉटेल’ या ठिकाणी संशयिताने पीडितेवर अत्याचार करण्यात आला. अखेर पीडित महिलेने धाडस करून १५ एप्रिल रोजी पाचोरा पोलीस गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेखर राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण घायाळ हे करत आहेत.



