
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या परसाडे बु. गावात आदिवासी तडवी-भिल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात पार पडला. समाजएकता, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा सोहळा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. मीना राजू तडवी यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात वधू-वरांकडून केवळ ११०० रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते. त्याबदल्यात वधूस साडी, वराला ड्रेस तसेच प्रत्येक जोडप्याला पलंग, गादी आणि संसारोपयोगी ४५ भांड्यांचा संच देऊन विवाह सोहळा पार पाडण्यात येतो. यंदा एकूण १० जोडप्यांचे विवाह मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) च्या राष्ट्रीय प्रवक्ता श्रीमती प्रतिभाताई शिंदे, हर्षल पाटील, सौ. सविता अतुल भालेराव, अहमद जबरा तडवी, राकेश वसंत फेगडे, विलास चौधरी, सागर कोळी, व्यंकटेशबारी, हुसेन जहांगीर तडवी, डॉ. रमजान गुलाब तडवी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासी तडवी-भिल समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक हमीद भायखा तडवी होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरपंच सौ. मीनाताई तडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अलाउद्दीन तडवी यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परसाडे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले.



