जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली तब्बल ४५ बेवारस वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडली आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे ही वाहने गंजून खराब होत असल्याने, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
वाहनांची सद्यस्थिती:
जळगाव शहर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींकडून अनेक वाहने हस्तगत करण्यात आली होती. यामध्ये स्प्लेंडर, पॅशन, शाईन, पल्सर, एच.एफ. डिलक्स आणि युनिकॉर्न अशा विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. ही वाहने अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात उघड्यावर असल्याने त्यांची दुरवस्था होत आहे. मालकांसाठी ६० दिवसांची मुदत:
ज्या नागरिकांची वाहने चोरीला गेली आहेत किंवा ज्यांचे या वाहनांवर मालकी हक्क, विमा हक्क किंवा तारण हक्क आहेत, त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत (दोन महिने) मूळ कागदपत्रांसह पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लिलावाची प्रक्रिया:
दिलेल्या ६० दिवसांच्या मुदतीत जर कोणीही मालक हक्क सांगण्यासाठी पुढे आले नाही, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ८७ नुसार संबंधित वाहनांचा जाहीर लिलाव करून त्यांची विल्हेवाट लावली जाईल. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा त्या वाहनावर हक्क राहणार नाही, असेही पोलीस अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.



