जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आघाडीचा डिजीटल मीडिया मंच म्हणून ख्यात असलेल्या लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या उदघाटन सोहळ्याची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली होती. रविवारी सायंकाळी रिंग रोडवरील स्वमालकीच्या कार्यालयाजवळ हा सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती, तर समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दुपारीच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कार्यालयास सदिच्छा भेट देऊन लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवाराला आशीर्वाद दिले. यासोबत युवा नेते प्रतापराव पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, भंगाळे ग्रुपचे संचालक भागवतदादा भंगाळे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजू बाविस्कर, भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ, यावलच्या नगराध्यक्षा छाया पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, रेड स्वस्तीक सोसायटीचे महाव्यवस्थापक अशोकदादा शिंदे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक डॉ. नरेंद्र वाघ, भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय ब्राह्मणे, जलतज्ज्ञ प्रकाश पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पीपीआरएलचे चेअरमन विनय पारख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, नगरसेवक तथा जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत विख्यात गायिका आशा भोसले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे संपादक/संचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविकातून आपल्या वाटचालीचा ओघवता आढावा प्रस्तुत केला. यात त्यांनी आपल्या डिजीटल मीडिया हाऊसच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सहकाऱ्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे नमूद केले.
परिवर्तन जळगावचे प्रमुख तथा प्रख्यात रंगकर्मी शंभूअण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतातून लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतांनाच शेखर पाटील यांच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या नजरेचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार तथा सोशल मीडिया तज्ज्ञ दिलीप तिवारी यांनी शेखर पाटील हे काळाची बदलती पावले लक्षात घेऊन बदल करत असून लाईव्ह ट्रेंडस न्यूज हे याचे प्रतीक असल्याचे नमूद केले. मनसेचे जिल्हाप्रमुख जमील देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता लाईव्ह ट्रेंडस न्यूज वार्तांकन करत असल्याचे आवर्जून नमूद केले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या सर्वसमावेशकतेबाबत वाखाणणी केली. कुणालाही झुकते माप न देतांना वृत्तांकन करण्याची या मीडिया मंचची भूमिकी ही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजची भूमिका ही समतोल आणि प्रशासनाची बाजू समजून घेणारी असल्याचे नमूद करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या मनोगतातून लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी शेखर पाटील यांच्या तंत्रस्नेही वाटचालीबाबत भाष्य करत लाईव्ह ट्रेंडस न्यूजला शुभेच्छा दिल्या. नगरसेवक तथा जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी पत्रकारितेतील आपल्या वाटचालीत शेखर पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. तर महापौर दीपमाला काळे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज विकासाच्या सकारात्मक वार्तांकनाच्या माध्यमातून मोठी भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. तर अशोकदादा शिंदे यांनी आपल्या मनोगतातून लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून शेखर पाटील धाडसी पत्रकारिता करत असल्याचे कौतुकोदगार काढले.
मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार
कार्यक्रमाच्या दरम्यान विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेखर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करतांनाच त्यांच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या मातोश्री मालतीबाई पाटील यांचा जाहीर सत्कार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते त्यांचा अतिशय हृद्य असा सत्कार करण्यात आला. या आकस्मीक सत्कारामुळे श्रीमती मालतीबाई पाटील या भारावल्याचे दिसून आले. तर अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले ख्यातनाम चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर यांचा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या सहकाऱ्यांसह शिलेदारांचा गौरव
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या आजवरच्या वाटचालीत कार्यालयीन सहकारी आणि तालुका प्रतिनिधींचा मोलाचा वाटा असून आजच्या या भव्य कार्यक्रमात या सर्वांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
उदघाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर विविध मान्यवरांसी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला शुभेच्छा दिल्या. संपादक शेखर पाटील यांनी या शुभेच्छांचा स्वीकार केला. रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी जमली होती. अतिशय चैतन्यदायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन हर्षल पाटील व अयाज मोहसीन यांनी केले. तर यशस्वीतेसाठी टिम लाईव्ह ट्रेंडस न्यूजने परिश्रम घेतले.



