Home Cities जळगाव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सै. नियाज अली भैय्या फौंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवार दि. 12 एप्रिल 2026 पासून या कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली आहे. 14 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांद्वारे सामाजिक एकता, संविधाननिष्ठा आणि देशभक्तीचा संदेश देण्यात येत आहे.

आज सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी फौंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत संविधानाशी, देशाशी आणि देशवासीयांशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली. देशाची एकता, अखंडता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संविधानाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य, हक्क आणि अधिकार जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच आपली कर्तव्येही महत्त्वाची आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाबद्दल सजग राहून आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हीच खरी बाबासाहेबांना अभिवादनाची भावना आहे.”

कार्यक्रमादरम्यान “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद” आणि “भारतीय संविधान झिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या घोषणांमुळे वातावरणात देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.

या कार्यक्रमाला सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकुर बादशाह, शेख शफी, इलियास नुरी, आसिफ रब्बानी, शेख रईस, युनूस अझीझ, शेख नझीरउद्दीन, शेख रहेमान, अन्सार खान, झुबेर रंगरेझ, अश्फाक बशीर, शेख नूर मोहम्मद, सलमान खान, शेख इनायत, फिरोझ खान, शेख शाहिद, मुश्ताक अब्बास, जावेद खान, शेख रागिब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. आयोजकांनी कळविले की, 14 एप्रिलपर्यंत विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound