पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बोदर्डे येथे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जळून खाक झाले असून सुमारे 10 एकर क्षेत्रावरील ज्वारी आणि मका पूर्णपणे नष्ट झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदर्डे येथील शेतकरी रामकृष्ण पुंडलिक पाटील आणि पांडुरंग पुंडलिक पाटील यांच्या शेतात दुपारच्या सुमारास विद्युत तारांमधून ठिणगी पडून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले आणि काढणीस तयार असलेले मका व ज्वारी पीक आगीत भस्मसात झाले. दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे पाच-पाच एकर म्हणजे एकूण दहा एकर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

आगीच्या तीव्रतेमुळे शेतातील संपूर्ण ठिबक सिंचन यंत्रणाही जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन काढणीच्या वेळी हातात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने नुकसान टाळता आले नाही.
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. बोदर्डे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज वितरण यंत्रणेची दुरुस्ती आणि देखभाल नियमितपणे करण्याची गरज व्यक्त होत आहे.



