यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारी लेखक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि समतेचे मूल्य रुजवण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली धांडे होत्या. यावेळी सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन, पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे तसेच गौरी भिरूड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी फुले यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांची उजळणी केली.

यानंतर शाळेच्या शिक्षिका कुंदा नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या फुले यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनीही यावेळी उत्सुकतेने सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा चौधरी यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पूनम कोळंबे यांनी व्यक्त केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून शाळेत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.



