जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतून घाण, कचरा आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण परिसरासह शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्याचे काम हाती घेतले.

या मोहिमेअंतर्गत मेहरूण येथील स्मशानभूमी परिसरात साचलेली घाण, वाढलेले गवत आणि अस्वच्छता दूर करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. तसेच शहरातील वर्दळीचा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे साचलेला कचरा हटवून परिसर चकाचक करण्यात आला आहे. दाणा बाजार परिसरातील जनता बँकेच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या कचरा डेपोची देखील सफाई करून त्या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे परिसरातील दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका कमी झाला आहे.
महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दीपमाला काळे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील स्वच्छता कामांना वेग आला आहे. साचलेल्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी तोडगा निघत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



