पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वरखेडी रोड परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुमारे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर नामदेव मोरे (वय ३२, रा. चाळीसगाव) हे पाचोरा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगाव चौफुलीच्या पुढे वरखेडी रस्त्यावरील हॉटेल साईमोक्षाजवळ अवैध गौण खनिज भरलेला एक पांढऱ्या-निळ्या रंगाचा १० चाकी टाटा डंपर जात असल्याचे त्यांना दिसून आले. सदर डंपरला नंबर प्लेट नव्हती.

जेव्हा तलाठी मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डंपर अडवून कारवाई सुरू केली, तेव्हा त्याठिकाणी शुभम गुजर नावाचा तरुण आला. त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत तलाठी मोरे यांची कॉलर पकडून त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. इतक्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ करत ‘तुला चॉपरने मारून टाकेल’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या गोंधळानंतर डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आला, तिथेही संशयित आरोपी ने येऊन पुन्हा गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकासह शुभम गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



