Home पर्यावरण पुढील ४८ तासांत महाराष्ट्रावर नवे हवामान संकट 

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रावर नवे हवामान संकट 


मुंबई – वृत्तसेवा । महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाचे संकट कोसळल्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यावर नव्या संकटाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरी भागात नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः द्राक्षे, कांदा आणि आंबा यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या हवामान बदलाचा इशारा अधिकच गंभीर मानला जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा प्रभाव वाढणार असून, विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच पुणे, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, ज्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भ विभागात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. येथे काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा भागातही अशीच परिस्थिती राहू शकते. मात्र, लातूर परिसरात ९ एप्रिल रोजी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही भागात पावसाची सर तर काही भागात कडक उन्हाचा सामना अशी मिश्र परिस्थिती निर्माण होऊ शकते.

या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर उष्णतेच्या लाटेचा धोका वाढल्याने राज्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.


Protected Content

Play sound