अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अमळनेर विभागात प्रोजेक्ट इंजिनिअरची नियुक्ती ही मुख्य अभियंत्यांनीच केली असल्याचा खुलासा कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजकडे केला असून यामुळे आता ‘लाडका अधिकारी’ योजनेचे जनक कोण ? याबाबतचा संभ्रम अजून वाढला आहे.
सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या मनमानी कारभाराच्या प्रकरणांमध्ये अजून एकाची भर पडली आहे. यात नियमबाह्य पध्दतीत प्रोजेक्ट इंजिनिअर अर्थात पी.ए. ची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या अन्य अधिकाऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना पसरली आहे. अनेकांना डावलून नियमांची पायमल्ली करत शाखा अभियंत्याकडे याचा पदभार सोपविण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

हा सर्व गैरप्रकार लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून जगासमोर येताच मोठी खळबळ उडाली. यानंतर सायंकाळी कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीला कॉल करून याबाबत आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ हे पद फार काही मोठे वा महत्वाचे नाही. आणि, आमच्या विभागात मुख्य अभियंता यांनीच स्वत: ही नियुक्ती केलेली असल्याची माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली. अर्थात या प्रकरणात सीई महोदयांकडेच त्यांनी अंगुली निर्देश केल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात नियुक्ती नेमकी कुणी आणि कशी केली ? याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूज हे नाशिक येथील मुख्य अभियंता आणि जळगावचे अधिक्षक अभियंता यांना भेटून याबाबत त्यांची बाजू नक्कीच जाणून घेणार आहोत. तथापि, या प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले असून याची उत्तरे सर्वसामान्यांसह सार्वजनीक बांधकाम खात्यातील अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांना मिळण्याची गरज आहे.
प्रोजेक्ट इंजिनिअर सारख्या पदावर नियमबाह्य नियुक्ती हा मुद्दा गंभीर असून जर ही नियुक्ती मुख्य अभियंत्यांनी केली असेल तर नक्कीच याची स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि सुभाष राऊत यांनी जर वरिष्ठांना अंधारात ठेवून ही नियुक्ती करून घेतली असेल तर याचे गांभीर्य नक्कीच वाढते. सार्वजनीक बांधकाम खात्यात ‘लाडका अधिकारी’ योजना ही नेमकी कुणी आणि कशा प्रकारे केली ? याबाबत आमच्याकडे ठोस माहिती असून यातून आम्ही हे प्रकरण तडीस नेणार आहोत.
तूर्तास, सुभाष राऊत यांनी मुख्य अभियंत्याकडे बोट दाखविले असले तरी त्यांनी वरिष्ठांना बनविले आहे का ? अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे ? यात ‘मिलीजुली सरकार’ आहे का ? या प्रश्नांची उत्तरे जनतेसह सार्वजनीक बांधकाम खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हवी आहेत.



