Home प्रशासन तहसील समता सैनिक दलाचे बिढ्यार आंदोलन आठव्या दिवशी मागे

समता सैनिक दलाचे बिढ्यार आंदोलन आठव्या दिवशी मागे


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे प्रेत यात्रेस मज्जाव केल्याच्या गंभीर घटनेवरून समता सैनिक दलाने उभारलेले बिढ्यार आंदोलन अखेर प्रशासनाने गुन्हे दाखल केल्यानंतर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. समाजातील संताप, प्रशासनावरचा वाढता दबाव आणि सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामुळे अखेर पोलिसांनी संबंधितांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.

तालुक्यातील वाणेगाव येथे मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीसाठी निश्चित केलेल्या जागेवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास अडथळे निर्माण होत असून, अतिक्रमणधारकांकडून मृत व्यक्तींच्या प्रेत यात्रेलाही मज्जाव केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली. विशेषतः एका मागासवर्गीय महिलेच्या प्रेत यात्रेला विरोध करण्यात आल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या घटनेविरोधात समता सैनिक दलाने प्रशासनाला अनेक वेळा निवेदने सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली होती. मात्र ठोस पावले उचलली जात नसल्याने ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जारगाव चौफुली येथून मोर्चा काढण्यात आला. समाज बांधव व भगिनींच्या मोठ्या सहभागासह हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला आणि तेथे संसार मांडो (बिढ्यार आंदोलन) सुरू करण्यात आले.

दरम्यान, ३० मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आठ दिवस पूर्ण होत असताना पोलिस प्रशासनाने अखेर कारवाई करत वाणेगाव येथील सहा जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत यांनी उपोषणकर्ते किशोर डोंगरे यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडवले.

या आंदोलनादरम्यान दफनभूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटवणे, त्या ठिकाणी संरक्षक भिंत व तार कंपाऊंड उभारणे, संबंधित समाजाला जागेचा ताबा देणे, तसेच स्थानिक नागरिकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सामाजिक सलोखा राखण्याच्या उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक अभिमान बाविस्कर, सुकलाल पवार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, तालुका कार्याध्यक्ष अजय संसारे, शहर अध्यक्ष गंगाराम तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.


Protected Content

Play sound