Home Cities चोपडा भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतविरोधात आमरण उपोषण

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतविरोधात आमरण उपोषण


चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. दीर्घकाळ पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलन उभारले असून या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.

वर्डी ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ८ मार्च २०२२ ते २५ जुलै २०२५ या कालावधीत विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये गटार बांधकाम, ढापे, गावहाळ काँक्रीटीकरण तसेच इतर कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटनुसार) न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वारंवार अर्ज, निवेदने आणि विनंत्या करूनही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी सुरू झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, नगरपालिका गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व अविनाश चुडामण शिंदे करत असून त्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

उपोषणस्थळी दिलीप पांडुरंग पाटील, संदीप शिंदे, अरुण पाटील, अनिल धनगर, अमोल पाटील, किशोर धनगर, पंकज पाटील आणि अतुल लोहार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने या आंदोलनाला दिवसेंदिवस बळ मिळत आहे.

ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता तरी संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा रंगली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 


Protected Content

Play sound