बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील चिंचखेड येथील एका ३८ वर्षीय तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नादगाव ते हिगणे रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका मारुती ओम्नी कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सखाराम पाटील (वय ३८, रा. चिंचखेड सिम, ता. बोदवड) हे आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ बीआर १४४०) घरी परतत होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास नादगाव ते हिगणे रोडवरील रामराव सिताराम पाटील यांच्या शेताजवळ मागून येणाऱ्या मारुती ओम्नी कारने (क्र. एमएच १९ सीयू १८९७) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात समाधान पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचा पुतण्या योगेश गोविंदा पाटील (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही, मात्र पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष चौधरी हे करीत आहे.



