
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल आणि रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी शेती व जनजीवन विस्कळीत केले असून, कालच्या मुसळधार पावसाने नुकसानाचे प्रमाण आणखी वाढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

रावेर-यावल परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांच्या छपरांचे नुकसान झाले तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून, केळी, कापूस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तातडीने हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल आणि कृषी विभागाने युद्धपातळीवर काम करून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत आणि शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
सध्या अनेक गावांमध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरत आहे. आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून पाहणी सुरू असून, शासनस्तरावर मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.



