
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हनुमान जयंतीनिमित्त जळगाव शहरासह ग्रामीण भागात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदा विशेष उपक्रम राबवत तब्बल 40 हनुमान मंदिरांमध्ये ‘गदा पूजन’ आयोजित करण्यात आले. या उपक्रमातून धर्मजागृतीसह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी बलोपासनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

सकाळी 6 वाजता पंचमुखी हनुमान मंदिर येथे जलमोत्सव सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाविकांच्या उपस्थितीत गदा पूजन करण्यात आले आणि वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर दानाबाजार येथील श्री अन्नदाता हनुमान मंदिरातही मोठ्या उत्साहात गदा पूजन पार पडले. यावेळी भाजप प्रदेश राज्य सचिव भैरवी पलांडे, दानाबाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक धूत, नगरसेवक विजय बांदल, राजेंद्र पांडे, दिनेश तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम तसेच भाजप युवा मोर्चाचे हर्षल सिखवाल यांची उपस्थिती होती.
असोदा येथील जागृत देवस्थान समिती तसेच श्रीराम पेठ येथील हनुमान मंदिरातही गदा पूजन कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये 400 हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. शहरातील विविध भागांमध्येही मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला. श्रीधर नगरातील जागृती हौसिंग सोसायटी, सुप्रीम कॉलनी, चौगुले प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज नगर, अयोध्या नगर, भोईटे नगर, खोटे नगर, एमआयडीसी परिसर तसेच पिंप्राळा येथील अष्टविनायक माता मंदिर या ठिकाणीही गदा पूजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना शारीरिक व मानसिक बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देत, हनुमानाच्या पराक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या या पूजन कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



