Home Cities जळगाव जळगावात ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ उपक्रमाचे आयोजन

जळगावात ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ उपक्रमाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक आणि अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत एप्रिल महिन्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित या डिजिटल शेतीशाळेत कृषी तज्ञांकडून पिक व्यवस्थापन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, निविष्ठा उत्पादन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

ही शेतीशाळा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून दर आठवड्याला सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यासाठी युट्यूब प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार असून, शेतकरी घरबसल्या तज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही सहजपणे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व नियोजन, ८ एप्रिल रोजी निविष्ठा व जैविक उत्पादन, १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि २२ एप्रिल रोजी भात लागवड तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. प्रत्येक सत्रात शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तज्ञ उपलब्ध राहणार आहेत.

या उपक्रमात जिल्ह्यातील शेतकरी गट, कृषी ताई, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) तसेच महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound