Home राजकीय लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मिळाली मुदत वाढ !

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मिळाली मुदत वाढ !


मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत अडचणी येत असलेल्या लाभार्थी महिलांसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली असून आता दुरुस्तीची अंतिम तारीख 31 मार्चऐवजी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, अनेक महिलांकडून ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सरकारने महिलांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिलांना आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि माहिती दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त एक महिना मिळणार आहे.

या निर्णयामागे राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसारच ही मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणांमुळे या योजनेपासून वंचित राहू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जुलै 2024 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या मदतीमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका आणि अपूर्ण माहितीमुळे काही महिलांना लाभ मिळण्यात अडथळे येत होते.

सरकारने दिलेली ही मुदतवाढ महिलांसाठी शेवटची संधी असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी 30 एप्रिलपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound