बोदवड-सुरेश कोळी । भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन गैरप्रकाराने खरेदी करून फसवणूक करण्यासह अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, २००२ साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमीनी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली विकत घेण्यात आल्या होत्या. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला जमीनाचा चांगला मोबदला मिळण्यासही कुटुंबातील सदस्यांना नियोजीत तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार तायडे कुटुंबाला एकनाथराव खडसे यांच्याकडून अगावू ५१ हजार रूपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदांवर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीनीची खरेदी करण्यात आली. यानंतर उर्वरित पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेली नाही.

अनेक वर्षे उलटून देखील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ या जागेवर साखर कारखाना उभारण्यात न आल्याचे पाहून तायडे कुटुंबाने २०२५ साली याबाबत माहिती घेतली असता त्यांना धक्का बसला. त्यांना ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावाने खरेदी करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे तायडे यांनी रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी पुढील पडताळणी केली असता ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. यामुळे रिपाइं पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली.
दरम्यान, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची प्रत पाहिली असता त्यात खाडाखोड करून खरेदी करणाऱ्याच्या अर्थात तापी-पुर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या जागी शारदा एकनाथ खडसे असे लिहल्याचे दिसून आले. यातील पान क्रमांक तेरा वर देखील खाडाखोड करून शारदा खडसे यांचे नाव टाकण्यात आल्याचे त्यांचा निदर्शनास आले. यानुसार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी त्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी या संदर्भात पोलीस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश दिले. या अनुषंगाने चमेलाबाई तुकाराम तायडे यांनी बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली.
त्यांच्या तक्रारीवरून एकनाथ गणपत खडसे, शारदा गणपत खडसे, मध्यस्थ इसम सुधाकर निनू पाटील तसेच बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुरनं ५४/२०२६ अंतर्गत बीएनएस २०२३ चे कलम ३१८ (४); ३१६ (२); ३३६(२); ३३६ (३); ३४०, ३ (३) या कलमांसह अनुसुचीत जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलम ३ (१) (एफ); ३ (१) (जी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने तक्रारदार चमेलाबाई तुकाराम तायडे यांचे नातू सोनू तायडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी सदर गुन्हा बोदवड पोलीस स्थानकात दाखल झाल्याची माहिती दिली.



