जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मन्यारखेडा येथे विश्वातील एकमेव ग्रह राशी नक्षत्र मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळा सोहळ्या भव्य जलयात्रा व शोभायात्रेला शनिवार, २८ मार्च रोजी उत्साहात प्रारंभ झाला. चिमुकल्या राम मंदिरातून सुरू झालेल्या या यात्रेत कळसधारी महिला, लेझीम पथक, ढोल-ताशांचा गजर आणि विविध आकर्षणांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
या शोभायात्रेची सुरुवात नवीन बस स्थानकाजवळील चिमुकल्या राम मंदिरातून करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य चौक, नेरी नाका, पांझरापोळ टाकी, तेली चौक, विठ्ठल मंदिर, भाग्यलक्ष्मी टेन्ट मार्गे कालिका माता मंदिर येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. मार्गभर विविध ठिकाणी भाविकांनी यात्रेचे स्वागत करत धार्मिक उत्साहाला उधाण आणले.

यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतातील विविध पवित्र नद्या तसेच समुद्राचे जल ५१ कलशांमध्ये भरून काढण्यात आलेली कलशयात्रा ठरली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला, ज्यामुळे भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शोभायात्रेच्या अग्रभागी दोन अश्व विशेष आकर्षण ठरले, तर उंट, बग्गी आणि ‘मोटू-पटलू’ या आकर्षक बाहुल्यांनी लहान मुलांचे लक्ष वेधून घेतले.
यात्रेत गावातील १२ वर्षांपर्यंतच्या मुलींच्या लेझीम पथकाने सादर केलेले तालबद्ध प्रदर्शन आणि मुलांच्या ढोल पथकाने दिलेला गजर यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. मन्यारखेडा आणि जळगाव परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला, ज्यामुळे यात्रेला भव्यतेची जोड मिळाली.
दरम्यान, मयूर महाराज यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी संवाद साधताना प्राणप्रतिष्ठा सोहळा २८ मार्च ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधींसह पार पडणार असल्याची माहिती दिली. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या धार्मिक उपक्रमामुळे गावात उत्सवाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



