यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत मंजूर झालेली सुमारे एक कोटी चार लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठेकेदार व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना अक्षरशः कोरडी पडली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
दहिगाव गावासाठी जलकुंभ उभारणी तसेच घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती. मागील वर्षी या कामाला सुरुवात झाली असली तरी ठेकेदाराने अत्यल्प काम करून प्रकल्प अर्धवट सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाईपलाईन टाकण्याचे कामही पूर्ण झालेले नसून जलकुंभासह इतर महत्त्वाची कामे प्रलंबित असल्यामुळे गावात नियमित पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे.

गावातील सध्याचा पाणीपुरवठा वीज कंपनीच्या लोडशेडिंगवर अवलंबून असल्याने रात्री-अपरात्री पाणी येते. परिणामी सुमारे ५० टक्के ग्रामस्थांना पाणीच मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ‘हर घर जल’ हा या योजनेचा मुख्य उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना मूलभूत गरजेसाठी संघर्ष करावा लागत आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराची मनमानी थांबवून काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ठेकेदाराकडून शासनाकडून निधी मिळत नसल्याचा दावा केला जात असला तरी काम थांबवण्याचे हे कारण ग्राह्य धरता येणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
याबाबत सरपंच अजय अडकमोल यांनी सांगितले की, “गावासाठी एक कोटी चार लाख रुपयांची योजना मंजूर असूनही पाईपलाईन, पाण्याची टाकी आणि इतर कामे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही आमची अपेक्षा आहे.” प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्त्वाची योजना असून प्रत्येक ग्रामीण घराला स्वच्छ पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. मात्र दहिगावमध्ये या योजनेची अंमलबजावणीच रखडल्याने शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



