Home क्राईम धावत्या बसचे चाक निखळले; २५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले !

धावत्या बसचे चाक निखळले; २५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गावर अडावद नजीक ‘लाल परी’ बसचा भीषण अपघात होता-होता टळला आहे. रावेर-सुरत बसचे धावत्या गाडीत मागचे चाक निखळल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, बसमधील २५ प्रवाशांचे प्राण सुदैवाने बचावले आहेत.

रावेर-सुरत बस (क्रमांक एमएच २० बीएल २१७८) ही बस शुक्रवारी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अडावद मार्गे प्रवाशांना घेऊन जात होती. अडावद येथील काबरा पेट्रोल पंपाजवळ बस आली असता, ड्रायव्हर साईडच्या मागच्या चाकाचे सर्व आठ नट अचानक तुटले. यामुळे धावत्या बसचे चाक निखळून वेगाने समोरून येणाऱ्या दुचाकीवर जाऊन आदळले.

या अपघातात दुचाकीस्वार गुलाबराव मुरलीधर पाटील हे चाक अंगावर आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या गुडघ्याला जबर मार लागला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक तरुण प्रशांत पाटील, पंकज पाटील, संजय पाटील व ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी गुलाबराव यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथे हलवण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत यावेळी प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. बसमध्ये बसलेले २५ प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील आणि अडावद वाहतूक नियंत्रक भूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.


Protected Content

Play sound