जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या शनिवार २८ मार्च रोजी भव्य ‘विराट हिंदू मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. बळीराम पेठेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ठीक ६ वाजता हा सोहळा संपन्न होणार असून, या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर केला जाणार आहे.
या विराट मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कानळदा येथील प्राचीन कण्वाश्रमाचे विद्यमान गादीपती अद्वैतानंदजी स्वामी यांची उपस्थिती. स्वामीजी यावेळी उपस्थित जनसमुदायाला आपले आशिर्वचन देणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मेळाव्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री श्री. देवेंद्रजी भावसार हे विचार मांडणार आहेत. ते आपल्या रोखठोक भाषणातून हिंदू समाजापुढील आव्हाने आणि कर्तव्यावर प्रकाश टाकतील. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तथा ज्येष्ठ पत्रकार सौ. शांताताई वाणी भूषविणार आहेत. मेळाव्याचा समारोप झाल्यानंतर रात्री ८:३० वाजता आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी बळीराम पेठेतील सर्व सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक वर्ग तसेच परिसरातील विविध गणेश मंडळे, देवी मंडळे आणि देवस्थानचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. संपूर्ण परिसरात भगवे वातावरण निर्माण झाले असून हिंदू मेळावा समितीचे उपाध्यक्ष डॉ. कृणाल महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व हिंदू बांधवांना या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



