जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा समारोप जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला असून या प्रशिक्षणात तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि डेटा सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला.
दि. २३ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या प्रशिक्षण शिबिरात तहसीलदार, मुख्याधिकारी, अतिरिक्त जनगणना अधिकारी, तांत्रिक सहाय्यक तसेच जनगणना लिपीक यांचा सहभाग होता. जनगणना संचालनालय, मुंबई येथील सहाय्यक संचालक अजय ठाकूर व विशाल दिवेकर यांनी सहभागी अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, या कामकाजाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून चार्ज अधिकारी व अतिरिक्त जनगणना अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूकतेने पार पाडणे आवश्यक आहे. जनगणनेची विश्वसनीयता ही संपूर्ण प्रशासनासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी HLO मोबाईल ॲपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. घरगुती माहिती संकलन, डेटा नोंदणी, अद्ययावत प्रक्रिया तसेच लॉगिन, नवीन घरांची नोंदणी, डेटा सेव्ह व सबमिट करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यासोबतच ॲप वापरताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण यावरही सखोल चर्चा झाली.
जिल्हा जनगणना पुस्तिकेच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुस्तिकेतील तक्ते, माहिती नोंदविण्याची पद्धत आणि अचूकता राखण्याचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे माहिती संकलन अधिक सुसंगत आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
डेटा एथिक्स, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे, अधिकृत वापर सुनिश्चित करणे आणि डेटा हाताळताना नियमांचे पालन करणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच मोबाईल व वेब ॲप वापरात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी वैशाली चव्हाण, तहसीलदार सुरेश कोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.



