Home Cities जळगाव मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’ची अखेरची संधी; फक्त ६ दिवस शिल्लक

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’ची अखेरची संधी; फक्त ६ दिवस शिल्लक


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या ‘शास्ती माफी’ अभय योजनेची मुदत आता संपत आली असून, मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ही शेवटची संधी उरली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार महानगरपालिकेने ५ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफीची अभय योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत कर भरणाऱ्या नागरिकांना दंडाच्या रकमेत मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे अनेक करदात्यांनी या संधीचा लाभ घेतला असून, उर्वरित नागरिकांनीही तातडीने कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मनपा प्रशासनाने नागरिकांना कर भरणा सुलभ व्हावा यासाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. क्यूआर कोड, नेट बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय अ‍ॅप्सच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या कर भरू शकतात. याशिवाय मनपाच्या कर संकलन केंद्रांवरही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले की, ही योजना नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात आली असली तरी ती केवळ मर्यादित कालावधीसाठीच आहे. ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच पुढील आर्थिक वर्षात अशी कोणतीही अभय योजना राबविली जाणार नाही. त्यामुळे करदात्यांनी दंडाची रक्कम वाचवण्यासाठी आणि थकबाकीमुक्त होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे त्यांनी आवाहन केले.

या निर्णयामुळे नियमित कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना दिलासा मिळाल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, योजनेची मुदत संपण्यास अवघे काही दिवस उरल्याने शेवटच्या टप्प्यात कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

 


Protected Content

Play sound