जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दि. १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

या योजनेत २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून निधी संरचनेत ४५ टक्के शासन अनुदान, ५० टक्के बँक कर्ज आणि ५ टक्के लाभार्थी हिस्सा यांचा समावेश आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजात ३० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची किंवा तारणाची आवश्यकता नसल्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून तो/ती महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा. तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



