Home क्राईम महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा ; कारवाईची मागणी

महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा ; कारवाईची मागणी


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.

यासंदर्भात नागद रोड, झोपडपट्टी परिसरातील रहिवासी यास्मिन जावेद शाह यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. अर्जात नमूद केल्यानुसार, सबा शेख या महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

एखाद्या पोलिस कर्मचाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. सेवा नियमांनुसार अशा प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करणे अपेक्षित असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. याशिवाय, या कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणी प्रकरणासंदर्भातही अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव यांच्याकडे अर्ज दिला असून त्यावरही कार्यवाही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित महिला पोलिस कर्मचारी सध्या सेवेत कार्यरत असून त्या आपल्या पदाचा गैरवापर करून तपासात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. साक्षीदारांवर दबाव टाकणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या गंभीर बाबींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे साक्षीदार पुढे येण्यास घाबरत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करावी तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पोलीस प्रशासनाविषयी जनतेमध्ये अविश्वास निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound