Home क्राईम भररस्त्यावर शाळकरी मुलीची छेडछाड ; एकावर गुन्हा दाखल

भररस्त्यावर शाळकरी मुलीची छेडछाड ; एकावर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील वर्दळीच्या नेताजी चौकात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ मार्च रोजी रात्री ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित १५ वर्षीय मुलगी ही चाळीसगावात एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. मंगळवारी २४ मार्च दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती आपल्या ओझर गावाकडे पायी जात होती. ती नेताजी चौकातील महादेव मंदिराजवळ पोहोचली असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या राजेंद्र महेंद्र पाटील (वय २५, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याने तिला गाठले.

संशयित आरोपी राजेंद्र याने अचानक मुलीच्या जवळ येऊन तिच्या अंगावरील ओढणी बळजबरीने ओढली. या अनपेक्षित प्रकारामुळे मुलगी घाबरली, मात्र तिने धीर न सोडता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिने आरोपीला “थांब, मी घरी फोन लावून तुझे नाव सांगते” असे ठणकावून सांगितले. मुलीचा आक्रमक पवित्रा पाहून आरोपी राजेंद्र पाटील याने तिथून पळ काढला.

याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र महेंद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण बाविस्कर हे करीत आहे.


Protected Content

Play sound