Home राजकीय अजित पवारांच्या घराबाहेर करण्यात आली ‘काळी जादू’ : रोहित पवार

अजित पवारांच्या घराबाहेर करण्यात आली ‘काळी जादू’ : रोहित पवार


मुंबई-वृत्तसेवा | उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूप्रकरणी दोन महिने उलटूनही महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नसल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कर्नाटकात जाऊन ‘झिरो एफआयआर’ नोंदवून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती दिली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की, “मरीन ड्राईव्ह, बारामती पोलीस आणि सीआयडीकडे वारंवार पाठपुरावा करूनही गुन्हा नोंद झाला नाही. त्यामुळे न्यायासाठी कर्नाटक गाठावे लागले.”

याचवेळी त्यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ‘काळी जादू’ करण्यात आली होती. काही नेत्यांनी पद मिळवण्यासाठी करंगळी कापल्याचा प्रकारही घडल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. “तपासात अडथळे आणले जात आहेत, ब्लॅक बॉक्स अद्याप अमेरिकेला पाठवलेला नाही,” असा आरोप त्यांनी केला.

राजकीय पातळीवर भाजप अजित पवारांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप रोहित पवार यांनी करत, लवकरच यासंदर्भात कागदपत्रे सादर करणार असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound