पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने पारोळ्यात क्षयरुग्णांचा सत्कार करत जनजागृतीचा संदेश देण्यात आला असून, सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश वाल्डे यांनी केले.
गेल्या दहा वर्षांपासून सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था क्षयरुग्णांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. शासनाच्या क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेली ही संस्था रुग्णांच्या मानसिक बळकटीसाठीही कार्यरत आहे. याच अनुषंगाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रुग्णांचा सत्कार करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा आणि मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ता. २५ रोजी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. जिनेंद्र पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. गिरीश जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव आशा पाटील, सदस्य शेखर पाटील यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी करुणा पवार, राखी बडगुजर, मनीषा महाले, सोनाली गुरव, श्रीमती चांगरे, ईश्वर आखाडे, भगवान चौधरी, राजेंद्र चंद्रात्रे, किशोर पाटील, बबन महाजन, प्रेम वानखेडे तसेच क्षयरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान क्षयरोगाची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, योग्य वेळी निदान आणि आवश्यक तपासण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांना योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सर्वेश्वर संस्थेकडून उपस्थित क्षयरुग्णांचा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली. या उपक्रमामुळे समाजात क्षयरोगाबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



